Subscribe Us

मन करा रे प्रसन्न – सर्व सिद्धीचे कारण ...........महत्त्व मनाच्या एकाग्रतेचे !!!

                             विद्यार्थ्यांसाठी ....... 

मन करा रे प्रसन्न – सर्व सिद्धीचे कारण ...........महत्त्व मनाच्या एकाग्रतेचे !!!

                यशाचे खरे रहस्य हे मनाच्या एकाग्रतेमधेच वसत असते हे सूज्ञलोक जाणून असतात. मनाच्या एकाग्रतेची गरज ही फक्त योगीजनांनाच नसते; तर ती सर्वांनाच असते. आपण असे पाहतो की लोहार, सुतार, सोनार, विणकर किंवा न्हावी ह्यांच्यासारख्या कुशल कारागीरांनी स्वत:मध्ये  स्वभावत:च मनाची एकाग्रता विकसित केलेली असते. हातोड्याचा घाव घालताना लोहाराचे लक्ष थोडेजरी विचलित झाले, तरी त्याचा हात कायमचा  निकामी होऊ शकतो. न्हाव्याचा वस्तरा किंचित जरी इकडे तिकडे गेला तर शरीराच्या कापण्याची व रक्तबंबाळ होण्याची शक्यता असते. सुताराच्या पटाशीची जागा चुकली तर अंगठा हातावेगळा होऊ शकतो. सर्वात नाजूक काम तर सोनाराचे असते. त्याचप्रमाणे विणकराला देखील चांगल्या वस्त्राच्या विणकामासाठी आपल्या हातमागाकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. 

             या सर्वांनी आपआपल्या व्यवसायाची गरज म्हणून स्वत:च्या ठिकाणी मनाची एकाग्रता सरावाने बाणवून घेतलेली असते. त्यासाठी त्यांना कुणाकडून मार्गदर्शनाची वा विशेष शिक्षणाची गरज भासत नाही. त्यांनी मनाच्या एकाग्रतेवरची पुस्तकेही अभ्यासलेली नसतात.परिस्थितीच त्यांना तयार करते. कशी असते ही परिस्थिती? छोट्याशा चुकीमुळे घडू शकणाऱ्या अपघाताची भीती त्या ठिकाणी असते. हे सारे लोक आपली कामे करताना धोक्याच्या छायेखाली वावरतात. त्यामुळे साहजिकच आपल्या मनावर लगाम ठेवून त्यांना सतत सतर्क राहावे लागते. लोहार कुटुंबातील एखादा मुलगा हा औद्योगिक प्रशिक्षणार्थी शिकावू उमेदवाराला सहजपणे मागे टाकतो. इतर उद्योग-धंद्यांमध्ये देखील हीच बाब लागू पडते. नवख्या माणसाला उद्योगधंद्यात कुशलता मिळाल्याची उदाहरणे तशी विरळ असतात. सतत परिश्रम केल्यास मनाची एकाग्रता साधणे शक्य आहे. 

               अगदी अशाच त-हेचे उत्तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनालाही दिले होते – “अभ्यासाने पूर्णत्वाचा लाभ होतो.” अर्जुनाने भगवंतांना विचारले होते.... - "कृष्णा मन मोठे चंचल आहे. ते सतत अस्वस्थ राहते. मात्र ते मोठे बलवान आहे. अशा मनाला ताब्यात ठेवणे हे वाऱ्याला पकडण्यासारखे आहे. मग अशा या मनावर ताबा मिळवणे कसे शक्य आहे ? यावर श्रीकृष्ण असे उत्तर देतात की, - "अर्जुना, तू म्हणतोस ते खरं आहे. मन नेहमी अस्वस्थ राहतं ही वस्तुस्थिती आहे. हे देखील खरं आहे की, या मनावर ताबा मिळवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे. म्हणूनच मी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती नीट ध्यानात घे. हेही तितकेच सत्य आहे की, अशा या चंचल मनाला, अखंड अभ्यास आणि अनासक्ती (वैराग्य) ह्यांच्या सामर्थ्याने ताब्यात आणता येते.”

अर्जुनाचा हा प्रश्न जितका स्वाभाविक आहे तितकेच श्रीकृष्णांनी त्याला दिलेले उत्तर हे सोपे आणि सरळ आहे.

                मनाची चंचलता ही काही नवी गोष्ट नाही, तर मानवजाती इतकीच ती पुरातन व प्राचीन अशी बाब आहे. अर्थात आज सर्वत्र दिसून येणाऱ्या स्वैर आणि नीतिहीन अशा स्वच्छंद जीवनप्रवाहामुळे मनाची चंचलता बरीच वाढल्याचे जाणवते. अर्जुनासारख्या धीर, गंभीर व सदाचरणी पुरुषाचे मन दोलायमान होऊ शकते; तर आजच्या सामान्य माणसाची काय कथा?  कलीयुगातली मानवजात सुखाच्या मागे चौखुर धावत असून त्यामुळे बेभान झाली आहे! आपल्या मनावर ताबा मिळविण्या अगोदर मानवी मनाचा स्वभाव जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच या मनाशी दोन हात करणे शक्य होणार आहे. माकडाचा खोडकरपणा आणि मस्तवाल हत्तीची ताकद यांचे मिश्रण म्हणजे माणसाचे मन होय. 

                अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच अशा या मनाला ताब्यात आणणे म्हणजे वाऱ्याला हातात पकडणेच होय. ज्याला माकडाला पकडण्याची व हत्तीला चुचकारण्याची कला माहीत आहे, तोच हे करू शकतो. प्रत्येक वस्तूला आणि प्राणीमात्राला या जगाच्या पाठीवर स्वत:ची पिंडगत अशी एक प्रवृत्ती असते. त्याप्रमाणे तो वागतो. त्यामुळेच वारा नेहमी वाहतो, अग्नी पेट घेतो, पाणी प्रवाहित होते. त्याचप्रमाणे माणसाचे मन प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते, स्वैरपणे उड्या मारते, वाटेल त्याची इच्छा धरते, हजारो गोष्टींची चिंता करते, हवेत इमले बांधते आणि आपल्याशी ज्याचा संबंध नाही अशा अनेक भानगडी उकरून काढते. हाच मनाचा स्वभाव आहे.छोट्यामोठ्या गोष्टींनी उत्तेजित होऊन अस्वस्थ होणे ही मनाची प्रवृत्ती आहे. तेव्हा त्याच्या तालावर नाचण्याखेरीज माणसाचा काय इलाज आहे? याच कारणामुळे, ज्या लोकांना आपल्या मनावर ताबा मिळवायचा असतो, ते लोक अशा – मनाला ओढून घेणाऱ्या वातावरणापासून सतत दूर राहण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ असा नव्हे की, आपण सर्वांनी शहरांपासून दूर पळायला हवे, तर आपण फक्त मनाची काळजी घेऊन त्याला सभोवारच्या वातावरणात अडकू देऊ नये. पण हे कसे करावयाचे? या ठिकाणी आता आपल्या पंचेंद्रियांचा विचार सुरू होतो. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पंचेंद्रिये आपल्या मनाचे वाहक असतात. डोळ्यांना एखादी सुंदर गोष्ट दिसली की मन लगेच तिथे जाऊन टपकते.          अशा रीतीने या इंद्रियसंवेदना आपल्या मनाला विविध दिशांनी फरफटत नेत असतात.बुद्धीचा उपयोग करून इंद्रियांना ताब्यात ठेवावे लागते. म्हणजेच अयोग्य दृश्यांपासून डोळ्यांना दूर ठेवावे., ऐकण्यायोग्य नसलेल्या गोष्टींपासून कानांना दूर ठेवावे., निषिद्ध खाद्यांपासून जिव्हेला दूर ठेवावे. करण्यायोग्य नसलेल्या गोष्टींपासून मनाला दूर ठेवता येते. यालाच संस्कृतमध्ये 'दम' म्हणतात. इंद्रियांच्या मदतीखेरीज देखील माणसाचे मन त्याच्या लहरीप्रमाणे वाटेल तिथे धावू शकते. अशा प्रसंगी बुद्धीची मदत घेऊन त्याला ठिकाणावर आणावे लागते. या पद्धतीने मनाला प्रत्यक्षपणे लगाम घालता येतो. मनाच्या समतोल सांभाळण्याच्या बाबीला संस्कृतमधील 'शम' साधना म्हणतात.

          मन आणि त्याच्या एकाग्रतेबाबतची ही सगळी बारीकसारीक माहिती कळल्यानंतरही एखाद्याला असे वाटू शकते की - “पण, मनावर ताबा मिळवण्याची ही सगळी धडपड कशासाठी करायची?" या अवखळ शंकेचे निरसन मात्र नीट करून घ्यायला हवे. त्यासाठी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, मनावर ताबा असेल तरच त्यायोगे मोठी मोठी कामे साध्य होतात आणि असा ताबा नसेल तर अगदी क्षुल्लक कामे देखील करणे पुष्कळदा अशक्य होऊन जाते. खरे म्हणजे मनाच्या ठिकाणी एक महान शक्ती आणि प्रचंड कर्तृत्व वास करीत असते. तरी देखील जगात अनेक माणसे मनाचा दुबळेपणा बाळगून आयुष्यभर रडत असतात. बऱ्या-वाइटाचा विचार न करता त्यांच्या मानसिक शक्तींचा व्यय भलतीकडेच होतो हे त्याचे मुख्य कारण.

           अनेकांना सूर्याच्या किरणांमधे अग्नी चेतवण्याचे सामर्थ्य आहे याची कल्पना नसते; असे का? कारण की, सूर्याच्या किरणांनी अग्नी पेटण्याच्या प्रसंगांचे नीट अवलोकन त्यांच्याकडून कधी झालेलेच नसते. मात्र तेच सूर्याचे किरण बहिर्गोल भिंगांच्या साह्याने एखाद्या कागदावर पाडले तर तो कागद जळू लागतो. आता त्या किरणांमधे ही शक्ती कुठून आली? हा सर्व एकाग्रतेचा परिणाम. त्याआधी ही किरणे विविध दिशांनी विखुरली होती. ती उष्णता देत होती पण अग्नी चेतवू शकत नव्हती. एकाग्रतेमुळे त्यांना ज्वलंत अग्नी निर्माण करता आला. हेच रहस्य आपण लक्षात घ्यायला हवे. मनामधे मूलत: भरपूर शक्ती साठवलेली आहे. या शक्तीचा - म्हणजे ऊर्जेचा - विनियोग आवश्यक व अनावश्यक ठिकाणी, इतक्या प्रकारे केला जातो की त्यामुळे नेहमीच्या गोष्टी सोडून अन्य काही करण्यास आपण असमर्थच ठरतो. जीवनात काही मोठ्या गोष्टी साधायच्या असतील तर इतरत्र वाया जाणाऱ्या ह्या मानसिक शक्तींना योग्य वळण द्यायला हवे आणि हे तेव्हाच साधू शकते की ज्यावेळी आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकू. मात्र ही मने तर आपल्या हातांवर तुरी देतात आणि वाटेल तिकडे धावत असतात. मग त्यांना 'आपली मने' तरी कसे म्हणायचे? जे मन इंद्रियांच्या आकर्षणाला बळी पडून त्यांच्यामागे धावत जाते ते मन 'आपले' कधीच असत नाही. तेव्हा जे मन आपले नाही त्याच्याकडून आपणाला हवे असणारे काम करवून घेणे खरेच शक्य आहे का? 


                                                                                                                           क्रमश:

              (मुख्य श्रोत :- विविध पुस्तके,स्वामी विवेकानंदांची जीवनी,विकिपीडिया.)


Post a Comment

0 Comments