प्रवास भूतानचा..... अनुभव प्रखर देशभक्तीचा!
लहानपणापासूनच निसर्गाचा आस्वाद घेणं आणि भटकंती करणं हा जणू माझा छंदच.इयत्ता चौथी मध्ये प्राथमिक शिक्षकांनी काढलेली जीवनातली माझी पहिली सहल.तीसुद्धा वेरूळ दौलताबाद यासारख्या प्रेक्षणीय स्थळी. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आई-वडिलांनी या सहलीला दिलेले 5 रुपये आणि माझ्या खर्चासाठी दिलेले 2 रुपये माझ्या जीवनातली 7 रुपयाची कमाई नसून,माझ्या सात जन्माची कमाई असावी,हे मी कधीही विसरू शकत नाही. प्राथमिक शाळेतून सुरू झालेला हा निसर्ग पाहणीचा प्रवास अगदी कालपर्यंत सेवन सिस्टर च्या प्रवासापर्यंत पोचला. माझं भटकंतीचं वेड 2011 पासून आणखीच बहरलं.2012 साली माझा पहिला विदेश दौरा झाला.थायलंड या देशाचं निसर्ग सौंदर्य आणि तिथली संस्कृती प्रत्यक्ष “याची डोळा याची देही!” जाणता आली. पुढे मे 2023 पर्यंत मी जवळजवळ 80 ते 90 टक्के भारत भ्रमण करून पावलो होतो.यावर्षीचा मे महिन्यातला सेव्हन सिस्टर्स टूर ठरलेला. प्रत्येक टूर मध्ये माझ्यासह पाच मित्रांना घेऊन स्वतःच्या गाडीने हा प्रवास मी पूर्ण केलेला आहे.यावर्षी सर्व मित्रांनी पूर्वांचल या प्रदेशांमध्ये भटकंतीला जाण्याचे ठरवले. एक मे रोजी झेंडावंदन करून आम्ही प्रवासाला लागलो. सिलिगुडी ला पोहोचल्यानंतर जवळच असलेल्या भूतान देशाचा दौरा करण्याचा जणू प्रणच आम्ही केला.सिलिगुडीच्या जवळच बांगला देशाची बॉर्डर आहे.त्या ठिकाणाला झिरो मिल किंवा बांगलाबांधा असं सुद्धा म्हणतात.या ठिकाणाला भेट दिल्यानंतर आम्ही भूतानला जाण्याचे ठरवले.सिलीगुडी वरून सुमारे 144 किलोमीटर भारत आणि भुतानच्या बॉर्डरवर वसलेलं जयगाव हे गाव आहे.सुमारे तीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही रात्रीच्या वेळी जयगावला पोहोचलो.
भूतानला जाण्यासाठी आम्ही दोन दिवस एक रात्रीचा टूर पॅकेज 26 हजार रुपयांमध्ये,बिके टूर्स अँड ट्रॅव्हल्स जयगाव यांच्याकडून घेतला.भूतानला जाण्यासाठी तुमच्याकडे भारतीय निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे.या ओळखपत्रावरून आम्हाला प्रवेश मिळाला टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाल्यांनी बाराशे रुपये प्रति व्यक्ती प्रवेश फी, हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च व वाहन खर्च समाविष्ट केलेला होता. जेवणाचा खर्च आम्ही आमचा करणार होतो.प्रवेश घेण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही भूतानच्या प्रवासाला जाण्यास सज्ज झालो.भूतानला जाण्यासाठी भारतीय निवडणूक ओळखपत्र व गाईड अत्यावश्यक आहे.त्याशिवाय प्रवेश मिळत नाही.भुतानच्या सीमेजवळ चेकपोस्ट आहे येथे दहा रुपयाचे तिकीट काढून तुम्ही प्रवेश घेऊ शकता.आमचा ड्रायव्हर आमच्यासाठी गाडी घेऊन सज्ज होता.चेकपोस्टच्या बाहेर निघताक्षणी आमच्या गाईडने त्याच्याकडे असलेले पाच पांढऱ्या रंगाचे रुमाल आमच्या गळ्यात एक एक करून घातले आणि आमचे जगातील सर्वात सुंदर,स्वच्छ आणि देशभक्तीने ओसंडून वाहत असलेल्या भूतान या देशामध्ये सहर्ष स्वागत केले. एवढे प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा पर्यटकांनाप्रति असलेली ही सद्भावना बघून हृदय सद्गदित झालं. भूतानचं पहिलं गाव फुंसुलिंग,या गावापासून आमच्या भूतान प्रवासाला सुरुवात झाली.घाट रस्ता ओलांडल्यानंतर मी ड्रायव्हरला त्याचे नाव विचारले त्याने अगदी हसत मुखाने वांगचुक डोरजी हे नाव सांगितले आणि निवडणूक आयोगाचं ओळखपत्र माझ्यासमोर केलं नेहमीप्रमाणे गाईड पुढे बसत असतो परंतु मी ड्रायव्हरच्या शेजारी बसल्यामुळे बिचार्या गाईडला सगळ्यात शेवटची जागा मिळाली परंतु तरीही तो आनंदाने आणि हसतमुखाने नेमून दिलेल्या जागी बसला. आम्ही सर्वजण स्वतःच्या कारने भूतानच्या सीमेपर्यंत आलो,हे ऐकून ड्रायव्हर सुद्धा आवाक झाला.प्रवासा दरम्यान स्वतःच्या देशा प्रतीची देशभक्ती व राजा प्रतीची एकनिष्ठता त्याने आम्हास पावलोपावली दाखवून दिली.
सुमारे पाच ते सहा तासाचा प्रवास करून आम्हाला भूतानच्या पारो या शहरामध्ये जायचे होते.प्रवासादरम्यान थकवा येऊ नये म्हणून मला चॉकलेट खाण्याची सवय होती. माझ्या खिशातले चॉकलेट मी गाडीतल्या सर्वांना वाटून दिले आणि माझ्याकडचं चॉकलेट रॅपर्स काढून तोंडात टाकलं. भारतीय सवयीनुसार चॉकलेटचं रॅपर मी रस्त्यावर फेकलं. वांगचुक डोरजीच्या हे तात्काळ लक्षात आलं. त्याने गाडी बाजूला थांबवली आणि मी ज्या दिशेला चॉकलेटचे रॅपर फेकले होते त्या दिशेला गेला.रस्त्यावर पडलेलं रॅपर्स उचलून माझ्या हातात आणून दिलं. गाडी चालू केली आणि मला निर्देश दिले की,शेवटच्या शीट च्या मागच्या बाजूला एक बॅग लटकलेली आहे, आपण सर्व कचरा त्या बॅगमध्ये टाकावा.“हा देश माझा आहे,या देशाला मी स्वतः सुद्धा घाण होऊ देत नाही, तर मी तुम्हास कशी घाण करू देईल?” हा संदेश जणू त्याने मला एका क्षणात दिला.आपल्या देशाप्रती प्रचंड आत्मीयता आणि देशभक्ती त्याच्या ह्या कृतीतून मला जाणवली.माझे हे कृत्य केल्यानंतरची त्याची प्रतिक्रिया बघून आमच्या मित्रांपैकी जे तंबाखू सेवन करत होते त्यांनी पुढील दोन दिवस तंबाखू तोंडात टाकलीच नाही हे मला चांगल्या प्रकारे जाणवले.
पारो या शहराकडे जाता जाता असंख्य डोंगरदऱ्या आणि दोन डोंगरांच्या मधून वाहणाऱ्या नद्या, डोंगरांच्या काठाला खिंडार पाडून बनवलेला नागमोडी वळणरस्ता,दोन डोंगरांच्या मधून नदीच्या वरून तयार केलेले आकर्षक पूल आणि तेथील रुंद रस्ते मनमोहून घेत होते.निसर्ग जणू या देशाला आपल्या कवेत सामावून घेत असल्याचा प्रत्यक्ष अंदाज पर्यटक या नात्याने आम्हा सर्वांना येत होता.पारो या शहरामध्ये एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.पारो शहरात एकमेव मोठा रस्ता,उर्वरित सर्व छोटे छोटे रस्ते होते.इमारती अगदी स्वित्झर्लंड सारख्या होत्या.गाईडकडे चौकशी केली असता,पारो शहराला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात हे समजले.किल्ला बघायला जात असताना शेकडो वर्षांपूर्वी बांधलेला लाकडी पूल ओलांडला तेव्हाच आम्हाला भूतान या देशाला ऑरगॅनिक कंट्री का म्हणतात? हे लक्षात आलं. कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा जंतुनाशक फवारण्या न करता पिकवलेली फळे, अन्नधान्य निसर्गतः जन्मास आलेली सर्व प्रकारच्या वनस्पती व पदार्थांची रेलचेल या देशामध्ये बघावयास मिळते. पर्यटकांना किल्ला पाहण्याची वेळ चार वाजेपर्यंतच होती. हिरमुसल्या चेहऱ्याने आम्ही मात्र त्या ठिकाणावरून परत आलो. गाईडने सांगितलेल्या माहितीवरून पाच वाजल्यानंतर त्याची आमच्या सोबतची ड्युटी संपते हे कळले.
सूर्य मावळतीला गेलेला होता.उंच उंच टेकड्यांच्या मागे सूर्य कधी जाऊन लपला हे कळले नाही.परंतु सायंकाळच्या तांबूस सूर्यप्रकाशात अजूनही शहर उजळलेलं दिसत होतं.रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच इमारती,सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारणतः दोन ते तीन फुटाच्या नाल्या होत्या.आमच्यापैकी एकाने आम्हाला बोटानेच सांडपाण्याची नाली दाखवली,त्या नालीतून वाहणारं स्वच्छ पाणी जणू हे सांडपाणी नसावं या खात्रीपर्यंत आम्ही आलो होतो.गाईडने आम्हाला संपूर्ण भूतान मध्ये कचऱ्याची विल्हेवाट आणि घाणीची विल्हेवाट कशी लावली जाते याची माहिती दिली.भूतान मध्ये कोणीही कचरा रस्त्यावर फेकत नाही.सुका तर सोडाच ओला कचरा देखील तुम्हाला कुठेही सापडणार नाही.संपूर्ण पारो शहरांमध्ये आम्हाला कोठेही चहाची हॉटेल,फेरीवाला, पानदुकानवाला, आपल्याकडे देशी दारू दुकानापुढे असतात तसे अंड्यावाले,मटन वाले,कोणत्याही प्रकारचे स्टॉल्स त्या ठिकाणी रस्त्यावर दिसले नाही.अत्यंत निर्मळ आणि नितळ असं पाणी निसर्गतःच फिल्टर केलेलं,आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ROच्या पाण्यापेक्षाही अत्यंत नितळ आणि नैसर्गिक मिनरल्सयुक्त पाणी तुम्हास या ठिकाणी मिळते.येथे आम्हास उंच उंच इमारती बघावयास मिळाल्या.बंगलो सिस्टम भूतान मध्ये कुठेही बघावयास मिळाली नाही.सर्वत्र अपार्टमेंट पद्धत होती. हॉटेल्स,मॉल्स,कपड्यांची दुकाने,स्टेशनरीची दुकाने,एवढेच काय,तर प्रत्येक दुकानात असलेल्या वाईन स्टॉलवर तुम्हास महिलाच बघावयास मिळतील.
भूतान या देशांमध्ये मातृप्रधान संस्कृती असल्याचे पावलो पावली जाणवते.महिलांचा दर्जा पुरुषांपेक्षा सर्वांच्याच नजरेत उच्च प्रतीचा आहे.पारो हे शहर अत्यंत सुंदर आणि रचनात्मक आहे.या शहरांमध्ये कुठेही अस्वच्छता नाही.आपल्या देशाप्रती आणि राजाप्रती प्रचंड आत्मीयता आणि स्वाभिमान असलेली माणसं आम्हास अनुभवता आली. तिथल्या राजाला देव मानणारी माणसं पावलोपावली आढळली.पारो हे शहर पारोच्यु या नदीवर वसलेलं, अत्यंत सुंदर आणि मनमोहक टेकड्यांच्या मधोमध असलेलं हे शहर मिनी स्विझर्लंड म्हणून ओळखलं जातं.किल्ला बघून आम्ही सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान हॉटेल डॅशलिंग च्या प्रवेशद्वारावर पोचलो.अत्यंत हसत मुखाने द्वारपालानं आमचं स्वागत केलं.भूतान मध्ये तुम्हास भारतीय जेवण सुद्धा मिळतं.परंतु भूतान मध्ये प्रचलित असलेले खाद्यपदार्थ आम्हास खाण्याची इच्छा आहे हे लक्षात आल्यावर वेटरने त्याच्या आवडीप्रमाणे आमचे जेवण आम्हास सादर केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आठ वाजेच्या सुमारास आम्ही हॉटेलमधून विमानतळाच्या दिशेने निघालो. पूर्व पश्चिम दिशांना दोन टोके असलेला रणवे. तसे पाहिला तर एखाद्या डोमेस्टिक विमानतळा एवढाच होता. परंतु असंख्य डोंगरदऱ्या असलेल्या या भूप्रदेशामध्ये एवढी सपाट जागा मिळणे सुद्धा अत्यंत नशीबच! कदाचित असेच समजून या ठिकाणी रणवे तयार केलेला असावा हे आमच्या सहज लक्षात आले. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण बाजू कडून प्रवेश आणि निर्गम द्वार आहेत.विमानतळाच्या बाजूलाच उंच उंच टेकड्या असल्यामुळे आम्ही मात्र दक्षिणेकडील टेकडीवरून नुकतेच उतरणाऱ्या विमानाच्या लँडिंग चा अनुभव घेत होतो.विमान तेवढे मोठे नव्हते.परंतु तरीही सुख सुविधांचा अभाव असलेल्या या देशांमध्ये जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आणि देशभक्तीच्या ताकतीने येथील लोकांनी संस्कृतीचे जतन करून आणि निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी न होऊ देता हे विमानतळ बनवल्याचे अगदी सहज लक्षात येते.
आता आम्हाला या ठिकाणावरून लॉयन व्ह्यू टेम्पल मॉन्स्ट्री या ठिकाणी जायचे होते. रस्त्याच्या विरुद्ध बाजूला सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर एक इमारत गाईडने दाखवली. या इमारतीचे नाव लॉयन व्ह्यू टेम्पल मॉन्स्ट्री आहे हे त्याने आवर्जून सांगितले. कधीकाळी या ठिकाणी दलाई लामा सुद्धा येऊन गेल्याचे आणि अनेक बौद्ध धर्मगुरुनी या ठिकाणी तपश्चर्या, ध्यानधारणा केल्याचे कळले.या ठिकाणी जाऊन येण्यासाठी सुमारे चार ते पाच तास लागतील हे मात्र तो आम्हा सांगणे विसरला नाही.वेळेच्या अभावामुळे आणि आम्हाला भूतानच्या थिंम्पू शहराला सुद्धा भेट द्यायची असल्यामुळे आम्ही या ठिकाणी जाण्याचे टाळले आणि पुन्हा हॉटेलकडे नाश्त्यासाठी वळलो.नाश्त्यासाठी खमंग भाजी पुरी तयार करण्यात आली होती.सर्वांनी अगदी मनसोक्त नाश्ता केला.वांगचुक डोरजी आणि फुबजोरजी या गाईडसह आम्ही पारो या शहरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि भूतानची राजधानी असलेल्या थिंम्पू या शहराकडे निघालो.वांगचू नदीवर असलेला छुझोम ब्रिज ओलांडून आम्ही भूंथांग उरा हायवे ने थिंम्पू शहराकडे निघालो.आम्ही थिंम्पू शहरात,रस्त्यावरील सर्व प्रकारची प्रेक्षणीय स्थळे,निसर्ग सौंदर्य न्याहाळत आणि वाटेल त्या ठिकाणी निसर्गाचे फोटो काढत सुमारे 12 वाजेच्या दरम्यान शहरांमध्ये पोचलो.जसे पारो हे शहर अत्यंत सुंदर आणि रचनात्मक होते तसेच थिंम्पू हे शहर सुद्धा अत्यंत आकर्षक आणि रचनात्मक होते काही घरे लहानशी होती.परंतु बहुतांश इमारती बहुमजली आढळल्या.हा देश आज पर्यंत कोणाचाही गुलाम राहिलेला नाही शिवाय या देशावर कोणीही आक्रमण केलं नाही. एवढा शांतता प्रिय देश.
भारतामध्ये बौद्ध मंदिरांना विहार,चैत्य,स्तूप व लेणी या नावाने ओळखले जाते.बौद्ध मंदिर हे बौद्ध धर्माचं,त्यांच्या अनुयायी असलेल्या बौद्धांचं,एक उपासना स्थळ आहे.या स्थळांमध्ये विहार, स्तूप, चैत्य, वॅट आणि पॅगोडा हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व भाषांमध्ये समाविष्ट होतात. बौद्ध धर्मातील मंदिर म्हणजेच बुद्धांचे शुद्ध क्षेत्र. पारंपारिक बौद्ध मंदिरे आंतरिक आणि बाह्य शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेली आहेत. त्याची रचना आणि वास्तुविशेषता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बदललेली आढळते. तशी वास्तुविशेषता या ठिकाणी आमच्या निदर्शनास आली. हे स्थळ तीन मजली आहे. आपण प्रवेश करतो त्या पूर्वेकडील गेट आणि पश्चिमेकडील गेट यांच्यामध्ये दरीखोऱ्या असल्यामुळे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील गेटमध्ये जमिनीपासून तर मंदिराच्या पृष्ठभागापर्यंत सुमारे 3 मजली इमारत उभी राहू शकेल एवढं अंतर आहे.जेव्हा आपण पूर्वेकडील द्वाराकडून गौतम बुद्धाच्या ध्यानमुद्रा प्रतिमेकडे जातो त्यावेळेला सुमारे 100 पायऱ्या तुम्हास ओलांडाव्या लागतात.सपाट भूपृष्ठावर पोहोचल्यानंतर तुमच्या दृष्टीस पडते ती भव्यदिव्य अशी 177 फूट उंच असलेली गौतम बुद्धांची ध्यानमुद्रित प्रतिमा! भूपृष्ठापासून दुसऱ्या मजल्यावर फार उंच असा चबुतरा तयार करून गौतम बुद्धाची ही प्रतिमा तयार केलेली आहे. आमची नजर अनाहूतपणे प्रतिमेच्या खालच्या मजल्यावर समोरच्या बाजूला असलेल्या धम्मस्तुपाकडे गेली. अत्यंत आकर्षक, सुंदर चित्रीकरण,आखीव आणि रेखीव कोरीव काम केलेलं स्तूप बघून डोळ्याचे पारणे फिटल्याचे मनाचे संकेत मेंदूपर्यंत पोहोचले. गाईडने दुसऱ्या मजल्यावर चालण्याची विनंती केली.द्वारापाशी पोहोचलो तेव्हा प्रतिमेच्या चारही बाजूने पितळी धातूपासून बनवलेल्या अनेक मूर्त्या पहावयास मिळाल्या.त्यांची सुंदरता आणि त्यांचा बोलकेपणा ‘न भूतो न भविष्यती!’ असा होता.या ठिकाणी फोटोग्राफीला सक्त मनाई आहे.आत प्रवेश करताक्षणी आम्हास गाईडने माहिती देण्यास सुरुवात केली.आत गौतम बुद्धाच्या सुमारे एक लाख मूर्ती तांबे पितळीच्या धातूपासून बनवलेल्या आहेत आणि त्यांची उंची सुमारे एक इंचापासून ते अडीच फुटापर्यंत असल्याचे गाईड कडून कळले.स्तूपाच्या मधोमध बौद्ध धर्मगुरु आणि भूतानचे धर्मगुरू यांच्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या.सोबतच भूतानच्या राजा आणि राणीच्या प्रतिमा सुद्धा फोटोच्या रूपाने ठेवलेल्या होत्या.गर्भगृहामध्ये निरव शांतता,मन: शांततेसाठी किती आवश्यक आहे? हे मात्र आमच्या लक्षात येत होतं.
पाच ते सहा तासाच्या प्रवासाअंती आम्ही सायंकाळी सात वाजता जयगावला पोचलो. भारतामध्ये परतलो आणि सुरू झाला तोच प्रवास.... दिसली मोकळी जागा की टाक कचरा! दिसला आडोसा की आटोपून घे लघुशंका! या संपूर्ण प्रवासादरम्यान देशाप्रती असलेली देशभक्ती आणि राजा प्रति असलेली एकनिष्ठता प्रकर्षाने जाणवली. भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणार राज्य म्हणजे सिक्कीम,डलहौसी यापूर्वी तोही प्रवास करून पाहिलेला होता. परंतु भूतानचा आलेला हा अनुभव अवर्णनीय आणि एकमेवाद्वितीय होता. एवढे मात्र नक्की!!!
लेखक :- गैबिनंद एकनाथ घुगे 9922507540
1 Comments
हा भूटान विषयी चा लेख वाचन करुन तिथल्या लोका प्रती आदर निर्माण झाला आणि आप ल्या देशावीषयी
ReplyDeleteची जागरुकता निर्मान झाली. या लेखाने मला भूटान फीरुन आल्याचा आंनद मिळाला. दन्यवाद. 🙏💐💐
thanks